Tuesday, December 31, 2013

लाल किल्ला

Published: Monday, December 30, 2013

येत्या २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक ६४ वर्षांचे, तर स्वतंत्र भारत ६७ वर्षांचा होईल. स्वतंत्र भारतापेक्षाही वयाने मोठय़ा असलेल्या काँग्रेस पक्षाने शनिवारी १२८ वर्षे पूर्ण केली आहेत. एखाद्या व्यक्तीसाठी ६७ वर्षे म्हणजे त्याचे संपूर्ण आयुष्य असते. पण विचारासाठी, देशासाठी ६७ वर्षांचा कालावधी म्हणजे अवघा एक क्षण असतो. स्वतंत्र भारत, प्रजासत्ताक भारत, आणीबाणीनंतरचा भारत, जागतिकीकरण स्वीकारलेला भारत व एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतर दशकभरात १७ कोटी मोबाइलधारक असलेला भारत, असे विकासाचे (?) अनेक टप्पे सांगता येतील. भारताच्या ६७ वर्षांचा आढावा जसा मोजक्या शब्दांत घेता येणार नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसची बदललेली वाटचालदेखील सांगता येणार नाही. विकासाला जसा काँग्रेस पक्ष कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे देशात राजकीय घराणेशाही, भ्रष्टाचार, हुजरेगिरीचा उदय, हेदेखील काँग्रेस पक्षातूनच आले आहे.
गुजरातमधील हरिपुरा येथे १९३८ साली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनावर पाच लाख रुपये खर्च झाला होता. एवढी मोठी रक्कम का, असा सवाल महात्मा गांधींनी सरदार पटेल यांना विचारला. त्यावर सरदार पटेल यांनी दिलेले उत्तर फार मार्मिक आहे. पटेल म्हणाले होते, लढा देणाऱ्या सैन्याचे मनोधैर्य उंचावण्याची गरज असते. त्यासाठी त्याच्या आवश्यक गरजांची पूर्तता करायला हवी. सरदार पटेल यांच्या हयातीत काँग्रेसला कधीही पैशांची चणचण भासली नाही. स्वतंत्र भारत दृष्टिक्षेपात येत असताना पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागणाऱ्या साऱ्या खर्चाची तजवीज सरदार पटेल यांनी केली होती. बिर्ला, टाटांसारखे उद्योगपती सरदार पटेल यांच्या शब्दाखातर कोटय़वधी रुपये द्यायला तयार असत. उद्योगपती व राजकारण्यांचे मधुर संबंध तेव्हापासूनचे, पण कधीही कुण्या राजकारण्याने त्याचा गैरवापर स्वातंत्र्यपूर्व काळात केल्याचे ऐकिवात नाही. स्वातंत्र्यानंतर हा शिरस्ता काँग्रेस पक्षाने मोडीत काढला. काँग्रेसच्या विद्यमान लोकसभा व राज्यसभा सदस्यांपैकी साठ टक्क्यांपेक्षा जास्त सदस्यांचे उद्योगधंदे आहेत. पक्षनिधीच्या बदल्यात उद्योजकांना आमदार-खासदारकी देण्याचा पायंडा स्वातंत्र्योत्तर, विशेषत: १९७० या दशकात काँग्रेसने पाडला. कुणाच्या नावावर कोळसा खाणी तर कुणाच्या नावावर वृत्तपत्र समूह, अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
साधेपणा हे विशेषण तर काँग्रेसवाल्यांनी कधीच मागे सोडले आहे. मात्र, साधेपणाचा आव आणणाऱ्यांची संख्या २४ अकबर रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. माजी 'आदर्श' मुख्यमंत्र्यांनी तर महाराष्ट्रासाठी नेमलेल्या एका दिल्लीवासी नेत्याला मर्सिडीझ बेन्झ सप्रेम भेट दिली होती. मर्सिडीझमधून हे नेते महाशय आपला पूर्वाश्रमीचा समाजवादी विचारांचा तात्त्विक चेहरा व खादीचे कपडे घालून पक्ष मुख्यालयात येऊ लागले. त्यांना मर्सिडीझ मिळाली म्हणून इतर नेत्यांच्या पोटात दुखले. त्यांनी चुगली केली म्हणून 'हायकमांड'कडून कानउघाडणी झाल्यावर हे नेते महाशय मर्सिडीझ बेन्झ नजीकच्या 'क्लॅरिजेस' हॉटेलमध्ये लावून तेथून साध्या कारने पक्षाच्या मुख्यालयात यायला लागले. काँग्रेसच्या बदलत्या वृत्तीसाठी हा दाखला पुरेसा आहे.
भारतीय राजकारणात 'हायकमांड' शब्दाला काँग्रेसनेच प्रतिष्ठा मिळवून दिली. सरदार वल्लभभाई पटेल जिवंत असेपर्यंत काँग्रेसमध्ये हायकमांड तेच होते. अगदी महात्मा गांधी यांच्या उपस्थितीतदेखील सरदार पटेल हेच निर्णय घेत असत. ना. भा. खरे मध्य प्रांताचे मुख्यमंत्री असताना त्यांनी वैयक्तिक अधिकाराचा वापर करून चार मुस्लीम युवकांना दलित मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात निदरेष मुक्त केले. ही साधारण १९४३ सालची गोष्ट. ना. भा. खरे ना गांधी गटाचे होते, ना पटेल गटाचे. त्यांचे स्वतंत्र संस्थान होते. पण मुस्लीम युवकांची नियमबाह्य़ सुटका केली म्हणून त्यांची खरडपट्टी काढून पटेल यांनी खरेंना राजीनामा द्यायला भाग पाडले होते. हे होते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे 'नैतिक बळ'. दुर्दैवाने हायकमांड या शब्दाला काँग्रेसमध्ये सध्या दहशतयुक्त आदर आहे. या आदरामुळे बराक ओबामा भारत दौऱ्यावर असेपर्यंत भ्रष्टाचारी नेत्यांचे मुख्यमंत्रिपद शाबूत असते. आपल्याच सरकारने तयार केलेला अध्यादेश 'हायकमांडला' फाडावा लागतो. एवढेच नव्हे तर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर 'आदर्श' अहवाल फेटाळल्याचा फेरविचार करा, असे सांगण्याची बुद्धी काँग्रेस हायकमांडला होते.
एखादा नेता प्रदेशस्तरावर मोठा होत असेल तर त्याचे पंख छाटण्याचा खानदानी क्रूरपणा काँग्रेसमध्ये प्रारंभापासून आहे. एखाद्याची उपयुक्तता संपली की त्या नेत्याच्या अस्तित्वावर गदा आलीच म्हणून समजा. ८० च्या दशकात सुरेश कलमाडी म्हणजे गांधी घराण्याचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. प्रथमच खासदार म्हणून निवडून येणाऱ्यांना बंगला मिळत नाही, पण कलमाडी यांना मात्र खासदार झाल्या-झाल्या बंगला मिळाला होता. आपण युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणजे जणू काही देशाचे माजी राष्ट्रपती आहोत, असा कलमाडींचा थाट होता. हा थाट दाखवून कलमाडींनी बंगला मिळवला. हुजरेगिरी करणाऱ्या कोटय़धीशांच्या पिढीचे ते आद्य प्रतिनिधी आहेत. त्यांना पुरेसे ओळखत असतानाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुखपद सहजपणे त्यांना मिळेल याची दक्षता काँग्रेसच्याच नेत्यांनी घेतली होती. आज कलमाडी काँग्रेसमध्ये एकाकी आहेत. शुंग्लू समितीचा अहवाल प्रमाण मानला तर शीला दीक्षित यांचाही 'कलमाडी' होऊ शकतो. शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शीला दीक्षित इतक्या अस्पृश्य ठरल्या की, त्यांच्याशी कुणी बोलायला तयार नव्हते. त्यांच्याशेजारी कुणी बसले नाही. अर्थात त्यांचेही पुनर्वसन होईल. त्यांची इच्छा असो अथवा नसो, त्यांना एखाददुसऱ्या राज्याचे राज्यपालपद दिले जाईल.
स्वतंत्र भारतात निवडक अपवाद वगळता प्रदीर्घ काळासाठी देशाची सत्ता काँग्रेसच्या; नव्हे तर गांधी घराण्याच्या हाती आहे. अशी घराणेशाही निर्माण होईल, याचे भान गांधी घराण्यातील साऱ्या नेत्यांना होते. योजनापूर्वक आपल्याच कुटुंबातील सदस्यांकडे सत्तेची चावी कशी राहील, याची काळजी गांधी कुटुंबीय घेत असतात. कालपरवा पार पडलेल्या काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला सोनिया गांधी जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिल्या. त्यांच्याऐवजी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना संबोधित केले. खासदारकी वगळता कोणत्याही पदावरून प्रशासन चालवण्याचा अनुभव नसणाऱ्या राहुल गांधी यांनी राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांची शिकवणी घेतली. ही नेतृत्वबदलाची चाहूल आहे. मात्र एकाच्या हयातीत दुसऱ्याच्या हाती पक्षाची धुरा सोपवली गेली नसल्याचा गांधी कुटुंबाचा इतिहास आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर इंदिरा गांधींनी पक्षावर पकड निर्माण केली. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या खांद्यावर जबाबदारी येऊन पडली. त्यांच्यानंतर सोनिया गांधी राजकारणात ओढल्या गेल्या. जोपर्यंत सोनिया गांधी राजकारणात सक्रिय आहेत, तोपर्यंत पक्षांतर्गत दुहेरी सत्ताकेंद्रामुळे राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रस्थापित होणे अशक्य आहे.
चार राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला नवसंजीवनीची गरज आहे. ही नवसंजीवनी देण्याची क्षमता फक्त राहुल अथवा प्रियंका गांधी यांच्यामध्येच असल्याचा भ्रम रुजल्याने इतरांचे नेतृत्व पुढे येण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदींचा वाढता प्रभाव, भाजपविरोधात हुकमी एक्का ठरणारा धर्माधतेचा क्षीण होत चाललेला मुद्दा, काँग्रेसच्या नेत्यांची समोर येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा साडेचार वर्षांचा 'मौन काळ', राहुल गांधी यांना भ्रष्टाचाराविरोधात आत्ताच 'अनुशासन पर्वा'ची आलेली आठवण, या आणि अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज होतो आहे. त्यातूनच दोन-अडीच वर्षांपूर्वी फेसबुक, ट्विटरवाल्यांना हिणवणारे काँग्रेस नेते सोशल नेटवर्किंग साइटवर सक्रिय झाले आहेत.
ऑस्कर फर्नाडिस यांच्यासारखा नेता रात्री दीड-दोन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटत असतो, तर दुसरीकडे मुकुल वासनिक यांच्यासारखा नेता कपडय़ाची इस्त्री खराब होणार नाही, याचीच काळजी घेतो. अशा दोन ध्रुवांवर राहणाऱ्या नेत्यांना काँग्रेसला एकत्र आणावे लागेल. मंत्रिमंडळात तरुण तर संघटनेत प्रौढ नेतृत्व, अशा दुहेरी कोंडीत काँग्रेस पक्ष आहे. १९८५ साली मुंबईत झालेल्या शताब्दी अधिवेशनात राजीव गांधी म्हणाले होते, मी राजकारणात केवळ माझ्या आईला साथ देण्याच्या एकमात्र उद्देशाने पाऊल ठेवले.  तिने मला ना कुठलीही सूचना केली ना कोणते सूत्र सांगितले. फक्त ती म्हणाली- 'खऱ्या भारताला व भारतीयांच्या समस्यांना जाणून घे'- आणि मी कामात बुडून गेलो. सोनिया गांधी यांनीदेखील राहुल गांधी यांना असेच 'सूत्र' सांगण्याची आज गरज आहे.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/yesterday-today-and-tomorrow-324006/?nopagi=1

Wednesday, March 3, 2010

ओस्साय...ओस्साय ते होलियो...

कटर घण.. कटर घण... घणचे कटर घण...कटर घण ! चा नाद..., हुर्रा रे हुर्रा आमच्या कालकाआईच्या डोक्यावर सोन्याचा तुर्रा.., अशी बोंबाबोंब! प्रतिपदेच्या चंद्राच्या प्रकाशात उजळून निघालेले मौजे मिरजोळे गाव! साथीला ......ची पुचाटली रे..होलियो, अशा घोषणा..! अवधूतचे रत्नागिरी आणि जोयनाच्या गोव्यात मला विलक्षण सारखेपणा जाणवला. त्यांचा शिमगा आपल्याकडे होळी..! आपल्या 'घाटी' लोकांमध्ये असतो तसा थिल्लरपण अजिबात नाही. खूप शिस्तबद्ध, सामुहिक भावना...ईश्वरी कार्य समजून केलेले समर्पण..साऱ्यांचा भावना देवाचा चरणी लीन होताना मी पहिल्या , अनुभवल्या . शिमग्याच्या त्या उत्सवात रात्रभर गावकार्यान्सोबत बोंबलत (हो बोंबलतच) फिरताना समूहात देव असतो असे सारखे वाटत होते, अजूनही वाटतेय.
रात्री १० वाजता हा कार्यक्रम सुरु होतो. पंचमीपासून उत्सवाला सुरुवात. रोज रात्री उशिरापर्यंत होळी जाळायची. मिरजोळे हे गाव १२ वाड्यांचे. एका वाडीत साधारण ५० ते ६० घरे. गुरुप्रसादचे घर एका वाडीवर. मागे पुढे नारळी - पोफळीची उंचच उंच झाडे. जिकडे पाहाल तिकडे हिरवळ, आणि लाल मातीत माखलेली वाट. अशा गावात शिमगा साजरा करायला गेलो होतो. सारे चाकरमाने मुंबईतून आपल्या गावी आलेले. कालिका , काल्कोबा व वाघजाई हि मिरजोळे गावाची दैवते. या ग्रामदेवतांची पूजा म्हणजे शिमगा ! शुद्ध पंचमीला देवीची रूपे लावतात. म्हणजे मुखवटे चढवून पालखीत बसवायचे. मुखवट्यांना हात लावण्याचा अधिकार फक्त गुरवांनाच. पूजेचा पहिला मान खोताचा. मग रोज देवीची पालखी नाचवायची. हे प्रचंड ताकदीचे काम. एकतर तुम्ही मस्तवाल (सांडासारखे) पेहलवान पाहिजे किंवा मग तर्र होण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमच्या सारखे बघे. पंचमी पासून पौर्णिमे पर्यंत देवी सहाणीवर असतात. (देवीचे शिग्म्यातील स्थान. म्हणजे या दिवसात देवी देवळात नसते; तर या सहाणीवर असते, अशी गावकर्यांची धारणा).
मग येतो होळी पुनवेचा दिवस. रात्री १२ वाजता सुरमाड आणण्यासाठी निघायचे. देवी कौल देईल तेच झाड तोडायचे. माझासमोर अंदाजे ५० ते ६० फूट माडाचे झाड जवळ जवळ २०० लोकांनी जमीनदोस्त केले. या कामात किती नारळी- पोफळी आणि आंब्याची झाडे कामी आली असतील ते 'देवच' जाणे. सारे managment गुरु झक मारतील, इतके चांगले नियोजन.
सुरमाडाची बांधाबांध झाली कि मग त्या झाडाला उचलून ठरवलेल्या ठिकाणी आणायचे. ढोल ताशांच्या आवाजात, मानkaryanchya सूचना , आणि अवघ्या गावाने भक्ती भावाने जोडलेले हात, अशा काहीश्या भारलेल्या वातावरणात रात्री १२ ते पाहते ५.३० पर्यंत हा माड योजलेल्या ठिकाणी पोहोचतो. हा उत्सव दृष्टीचा. केवळ डोळ्यात साठवून ठेवावा असा. मग होळी पेटवायची. काहींनी ती विझवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा.
मग देवीला गार्हाणी सांगायची. (म्हणजे नवस) . पहाटे साडेसहा वाजेपर्यंत हाच उद्योग. मग घरी जायचे. असा हा मी अनुभवलेला शिमगा.
पुस्तकातून वाचलेले आठवते. एक मुलगा त्याचा मुंबईच्या साहेबाला सांगत असतो, ' प्रतिपदेचे पिठूर चांदणे माझा कोकणातल्या घराच्या अंगणात उतरून यावे. आणि मी त्याला अलगद कडेवर उचलून घ्यावे. बस..! मला हेच सारखे आठवत होते.
देव नसल्याची अनुभूती कित्येकदा आली आहे. पण समूहात एक ईश्वरी अंश असतो याची जाणीव या निमित्ताने अधिकच गडद होत होती.
sesonable tourisim करणार्यांनी, कोकणातल्या, गोव्यातल्या एखाद्या गावात जावून हा अनुभव नक्की घ्या. कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे, याची अनुभूती पुस्तकातून कशी मिळणार?
(या उत्सवामुळे जाती पतीचे जवळून दर्शन झाले. बहुजनांचा हा उत्सव. पण आद्य पूजेचा मान सारस्वतांचा. पण कुठे बडेजाव नाही , कि जातीय अभिनिवेश नाही. ' जाती पातीच्या जुनाट भिंती , कुठेतरी थिट्या होतांना दिसल्यात.)
(' एक समस्या, एक विचार आणि एक कृती' हे मनाशी जुळलेले समीकरण काहीसे अपूर्ण होते. त्याच्या पुढचा भाग या शिमग्यात गवसला. सर्वांना एकाच वेळी गुंतवून ठेवेल असा कार्यक्रम! मग भलेही तो धार्मिक का असेना..! 'दाद्या'च्या भाषेत organised efforts )

Monday, January 18, 2010

तियात्र

माझ्या हातरुमालाइतके (कदाचित कमीच) कपडे अंगावर असलेल्या अनेक पर्यटक गोव्याचा कलंगुट, अंजुना, सिकेरी, वाघातूर बीचवर भारतीय संस्कृती पाहायला येतात; आणि भारतीय पर्यटक त्यांना. हे गोव्याचे पर्यटन! तुम्हाला गोवा अनुभवायचा असेल तर ग्रामीण भागात जा. ग्रामीण भागात गेल्यावर मी 'माझ्या गोव्याच्या भूमी' तला गोवा अनुभवला.
लाल मातीतले वळणाचे रस्ते. पहाटेचे धुके. नारळी- पोफळीचा बागा. आणि सांस्कृतिक वातावरण. आणि
तियात्र. तियात्र हा इथला आवडता कलाप्रकार. तीयात्रात कितीही संख्या असू शकते. लाइव म्युझिक हे तीयात्राची खासियत. माशासारखे सुंदर डोळे (इथल्या मुलींचे हे वैशिष्ट्य) असलेल्या नटया . त्यांचा समवेत पुरुषांचा कसदार अभिनय . तियात्र म्हणजे साडेतीन तासांचे ज्वलंत विषयावर भाष्य करणारे रोमन नाटक. अफलातून प्रकार आहे. तियात्र म्हणजे पोर्तुगीज भाषेत नाटक.
तीयात्रातील कांताराच्या ( कोंकणीत गीत) काही ओळी -
हि आयाजकालची भुरगी केन्ना शिकपाना, फकत चेडवा बराबर रावून करता पिशेपणा, फ्रेंड- फ्रेंड म्हणोन सगळ्यांच्या घालतात काना...... आनी मोगचो फोग जाऊन पडतात फोणा.
(माझे सहकारी शेखर नाईक हे स्वतः उत्तम कलाकार आहेत. त्यांचा कडून ऐकलेल्या या काही ओळी. एका दमात या ओळी म्हणायच्या हे विशेष. शेखरविषयी नंतर कधीतरी.)

Saturday, January 16, 2010

देव बरे करो म्हंता !

देव बरे करो म्हंता !
हि गोव्याची आभार प्रदर्शनाची पद्धत. म्हणजे एखाद्या कार्यक्रमात आभार मानायचे असल्यास तेंका देव भले करो म्हंता, असे म्हटले कि झाले. फुटकळ, फाटकळ , चोरलेल्या कविता न वापरता देव बरे करो म्हंता, असे म्हणायचे. आवडली बुवा आपल्याला हि पद्धत.

Wednesday, January 6, 2010

सुशेगाद !

अरोरा टोवेर्स ते सांतान इज (पणजिम) हा प्रवास तसा फार कंटाळवाणा नाही. सकाळी अमृततुल्यची सवय असल्याने सकाळी सकाळी बारच सुरु असतात; हेच तेवढे वेगळेपण. इथे रमलोय. भरीस भर म्हणजे आता महाराष्ट्रातून फोन आला कि काय 'गोवेकर कसे आहात?', असे विचारले कि बरे असा.'.तुम्ही खोयेन असा? असे उलट विचारले कि मग समोरचा गप्प होतो.
पिण्याचा पाण्यालासुधा इथे माशाचा वास येतो, त्यामुळे खाण्याबद्दल फार काही लिहित नाही.
गो मन तक - असे वर्णन एका मित्राने केले होते. तेच खरे आहे. परदेशी पर्यटक, 'मद्य'रात्री यापेक्षा गोवा खूपच वेगळा आहे. पोर्तुगीजांच्या पारतंत्राच्या खुणा जपत, भारतीय अस्मितेची लक्तरे अरबी समुद्राचा वेशीवर लटकलेली मला दिसलीत. त्यात मी 'भायला' ! कुठेही गेलो कि मीच आता मी 'घाटी' असल्याचा परिचय देतो; त्यामुळे पुढे प्रोब्लेम येत नाही. इथल्या भाषेवर, खाण्यावर, 'पिण्या'वर, संस्कृतीवर पोर्तुगिजांचा प्रभाव खूप आहे. एकाचवेळी कोंकणी, पोर्तुगीज शिकता येईल याचा आनंद आहेच. नवे मित्र मैत्रिणी भेटलेत.
वातावरणाशी जुळवून घेत, विरोधकांना टपली मारत हळू हळू काम शिकतोय. भात- तळलेला बांगडा, कढी, आमसुलाचे सार, पापड, लोणचे असे जेवण असल्याने पोटाची चिंता नाही.
इथे सकाळी दिवस लवकर सुरु होतो. साडेतीन वाजता इथे संध्याकाळ होते आणि आठ वाजता मध्यरात्र. बार तेवढे सुरु असतात. सकाळी उठून कोणती दारू घ्यायची आणि कोणता मासा खायचा; याच विचाराने दिवस सुरु होतो. (सध्या तरी माझा नाही.)
समुद्र मात्र धुंद करणारा. अफाट. आपली औकाद पहायची असेल न तर, समुद्रावर या. इथे कळते आपण किती शुद्र आहोत ते.!
मध्ये एकदा बा. भ. बोरकर यांचा गावी जाऊन आलो. मोठा माणूस होता. त्यांचा काळापासून सुरु असलेला कोंकणी मराठी वाद अजूनही सुरु आहे. परकीय आपल्यात भांडणे लावून जातात आणि आपण मुर्खासारखे भांडतो, याला गोवासुद्धा अपवाद नाही. तरीही ' आहे तसा स्वीकारा आणि पाहिजे तसा घडवा' हे सूत्र माझा मनाशी पक्के आहे. वातावरण, खाण्याला सरावलो आहे. माणसांचीही सवय होईल.
गोव्यात रुळण्यासाठी मला मदत करणारे गणाधीश प्रभुदेसाई (पुणे, लोकसत्ता) व जोयना (डीएनए, मुंबई) यांचे आभार!
सध्या तरी आयुष्य 'सुशेगाद'!!!!!!!!!!!

Monday, November 2, 2009

जुन्याच रक्ताची नवी पिढी

परवा एका जेष्ठ्य राजकारणी नेत्याशी बोललो। लोकशाहीची थट्टा ज्यामुळे होते आहे त्या घराणेशाहीवर। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील तर राजकारण्याचा मुलगा राजकारणी का नको? असा साक्षात्कार (?) त्यांनी मला करवून दिला. मी पण अगदी आतुर असल्याचा आव आणून त्यांना ऐकत होतो. अर्थात जमलेले सर्व बावळट अशा अविर्भावात ते बोलत होते. त्यांना म्हटले, ''असे असेल तर मग तळागाळातल्या (सतरंज्या उचलणाऱ्या) कार्यकर्त्यांचे काय? त्यांनी आधी तुमच्या आणि आता तुमच्या दिवटयांच्या चरणीच निष्ठा वाहायची? '' मग मात्र ते विधानसभेत बसतात तसे बसले (गप्प). ( ऑफ द रेकॉर्ड - काही वर्षांनी लोकशाही नावाची सर्कस, जनता जनावरे आणि रिंगमास्टर.............! येत्या पाच वर्षात कळेलच म्हणा हि राजकारणातली जुन्याच रक्ताची नवी पिढी काय प्रकाश पडते ते. ) लोकसभा व त्यानंतर लगेचच आलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे घराणेशाहीचा मुद्दा फारच चघळला गेला. अर्थात 'राजकारण्यांच्या मुलांमध्ये कर्तुत्व नसते काय?' असे राष्ट्रवादीचे जेष्ठ्य नेत्याला वाटत असेल तर गैर काही नाही. पण साहेब फक्त एका प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही तुम्ही द्याल? चवथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा धडा होता. म्हणे शिवबांनी हिंदवी स्वराज्य, आणि रयतेच्या रक्षणासाठी मिर्झा राजे जयसिंग यांना राज्य देऊ करून स्वतः तुमची चाकरी करीन अशी विनवणी केली होती. त्यावेळी शिवाजी महाराज संभाजीराजांच्या कर्तृत्वासाठी भांडले नाहीत का?''
समाजाच्या हितासाठी अनेक नेत्यांनी वैयक्तिक जीवनात कठोर निर्णय घेतल्याचे स्मरते. भारत स्वतंत्र होत असताना नौखालीत जातीय दंगली शमवणारे गांधी भेटले, 'ऑपरेशन ब्लू स्टार' नंतर अनेकदा सूचना करूनही शीख अंगरक्षक न बदलणाऱ्या इंदिराजीही भावल्या. जे पी यांनी तर त्यांचा पिढीला वेड लावायचे बाकी ठेवले होते. आणि हो राहिलंच मंत्रीपदावरून सबंध राज्याला २०- २० वरून अनिश्चिततेच्या पीचवर उभे करणारे नेतेही यंदाच्या साठमारीत बघायला मिळाले. (तुम्ही ऐकताय ना 'राजे' ?)

Monday, October 5, 2009

'तत: किम'

'जाती पाती जुनाट भिंती,पाडूनी टाकू घडवू क्रांती', या गीताच्या ओळी आमच्या पत्रकार, कार्यकर्ता, सहकारी मित्राने ऐकवल्या. जुन्या आठवणीत ते रमले, मलाही रमवले! कधी प्रबोधीनिमुळे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचात निर्माण झालेली उर्मी तर कधी नर्मदा बचाव आंदोलनात केलेले कार्य, सार्याचा पट त्यांनी मांडला. त्यांचे भारावून जायचे ते दिवस होते. माझा पिढीला असे भारावून जाता आलाच नाही. मोठी माणसे भेटलीत पण त्यांचे पाय मातीचे दिसलेत. तुलेनेने हे नशीबवान निघाले. ''दहा वर्षांच्या पत्रकारीतेनंतरहि माझातला कार्यकर्ता मला जिवंत ठेवायचा आहे,'' असे सांगताना त्यासाठी त्यांची चाललेली तळमळ मलाही स्पर्शून गेलीच. दहा वर्षांपूर्वी नर्मदा बचाव आंदोलनातला सहभाग, प्रबोधीनितले त्यांचे 'पूर्णवेळ' असतानाचे दिवस, अण्णा हजारेंचा गावात जाऊन केलेले काम, सारं तनामनावर संस्कार करणाऱ्या दिवसांचा कॅनव्हास ते चितारत होते आणि मी मात्र त्यातून माझे कोलाज शोधात होतो. आमचे वय सारखे नाही, अनुभव सारखा असणे तर दूरच. पण एक धागा मात्र समान. विचारसरणी म्हणता येणार नाही पण जुनी पद्य एकली कि भारावून जाणे कदाचित हेच सारखेपण. त्यातच त्यांनी 'तत: किम' (तरी सुद्धा) हे पद्य गुणगुणले. मला चाल माहित नाही. पण एक ओळ मात्र थेट भिडलीच.. ''क्षणाचीच आरास जाईल हि वाया, जरी जीवनी राष्ट्रसेवा घडेना!'' अर्थात माझा मनातील आंदोलने क्षणिक नाहीत हे मला ठावूक आहे. आताशा कुठे माझा समस्यांची जाणीव होते आहे; समाजाच्या समस्या कधी समजून घेणार? त्यात व्याप वाढत आहेत. पण माझे हे पत्रकार कम कार्यकर्ता मित्र मला नेहमी सांगतात,' तुझा वयाचा असताना मी हि असाच होतो.! ''