Wednesday, March 3, 2010

ओस्साय...ओस्साय ते होलियो...

कटर घण.. कटर घण... घणचे कटर घण...कटर घण ! चा नाद..., हुर्रा रे हुर्रा आमच्या कालकाआईच्या डोक्यावर सोन्याचा तुर्रा.., अशी बोंबाबोंब! प्रतिपदेच्या चंद्राच्या प्रकाशात उजळून निघालेले मौजे मिरजोळे गाव! साथीला ......ची पुचाटली रे..होलियो, अशा घोषणा..! अवधूतचे रत्नागिरी आणि जोयनाच्या गोव्यात मला विलक्षण सारखेपणा जाणवला. त्यांचा शिमगा आपल्याकडे होळी..! आपल्या 'घाटी' लोकांमध्ये असतो तसा थिल्लरपण अजिबात नाही. खूप शिस्तबद्ध, सामुहिक भावना...ईश्वरी कार्य समजून केलेले समर्पण..साऱ्यांचा भावना देवाचा चरणी लीन होताना मी पहिल्या , अनुभवल्या . शिमग्याच्या त्या उत्सवात रात्रभर गावकार्यान्सोबत बोंबलत (हो बोंबलतच) फिरताना समूहात देव असतो असे सारखे वाटत होते, अजूनही वाटतेय.
रात्री १० वाजता हा कार्यक्रम सुरु होतो. पंचमीपासून उत्सवाला सुरुवात. रोज रात्री उशिरापर्यंत होळी जाळायची. मिरजोळे हे गाव १२ वाड्यांचे. एका वाडीत साधारण ५० ते ६० घरे. गुरुप्रसादचे घर एका वाडीवर. मागे पुढे नारळी - पोफळीची उंचच उंच झाडे. जिकडे पाहाल तिकडे हिरवळ, आणि लाल मातीत माखलेली वाट. अशा गावात शिमगा साजरा करायला गेलो होतो. सारे चाकरमाने मुंबईतून आपल्या गावी आलेले. कालिका , काल्कोबा व वाघजाई हि मिरजोळे गावाची दैवते. या ग्रामदेवतांची पूजा म्हणजे शिमगा ! शुद्ध पंचमीला देवीची रूपे लावतात. म्हणजे मुखवटे चढवून पालखीत बसवायचे. मुखवट्यांना हात लावण्याचा अधिकार फक्त गुरवांनाच. पूजेचा पहिला मान खोताचा. मग रोज देवीची पालखी नाचवायची. हे प्रचंड ताकदीचे काम. एकतर तुम्ही मस्तवाल (सांडासारखे) पेहलवान पाहिजे किंवा मग तर्र होण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमच्या सारखे बघे. पंचमी पासून पौर्णिमे पर्यंत देवी सहाणीवर असतात. (देवीचे शिग्म्यातील स्थान. म्हणजे या दिवसात देवी देवळात नसते; तर या सहाणीवर असते, अशी गावकर्यांची धारणा).
मग येतो होळी पुनवेचा दिवस. रात्री १२ वाजता सुरमाड आणण्यासाठी निघायचे. देवी कौल देईल तेच झाड तोडायचे. माझासमोर अंदाजे ५० ते ६० फूट माडाचे झाड जवळ जवळ २०० लोकांनी जमीनदोस्त केले. या कामात किती नारळी- पोफळी आणि आंब्याची झाडे कामी आली असतील ते 'देवच' जाणे. सारे managment गुरु झक मारतील, इतके चांगले नियोजन.
सुरमाडाची बांधाबांध झाली कि मग त्या झाडाला उचलून ठरवलेल्या ठिकाणी आणायचे. ढोल ताशांच्या आवाजात, मानkaryanchya सूचना , आणि अवघ्या गावाने भक्ती भावाने जोडलेले हात, अशा काहीश्या भारलेल्या वातावरणात रात्री १२ ते पाहते ५.३० पर्यंत हा माड योजलेल्या ठिकाणी पोहोचतो. हा उत्सव दृष्टीचा. केवळ डोळ्यात साठवून ठेवावा असा. मग होळी पेटवायची. काहींनी ती विझवण्याचा (अयशस्वी) प्रयत्न करायचा.
मग देवीला गार्हाणी सांगायची. (म्हणजे नवस) . पहाटे साडेसहा वाजेपर्यंत हाच उद्योग. मग घरी जायचे. असा हा मी अनुभवलेला शिमगा.
पुस्तकातून वाचलेले आठवते. एक मुलगा त्याचा मुंबईच्या साहेबाला सांगत असतो, ' प्रतिपदेचे पिठूर चांदणे माझा कोकणातल्या घराच्या अंगणात उतरून यावे. आणि मी त्याला अलगद कडेवर उचलून घ्यावे. बस..! मला हेच सारखे आठवत होते.
देव नसल्याची अनुभूती कित्येकदा आली आहे. पण समूहात एक ईश्वरी अंश असतो याची जाणीव या निमित्ताने अधिकच गडद होत होती.
sesonable tourisim करणार्यांनी, कोकणातल्या, गोव्यातल्या एखाद्या गावात जावून हा अनुभव नक्की घ्या. कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे, याची अनुभूती पुस्तकातून कशी मिळणार?
(या उत्सवामुळे जाती पतीचे जवळून दर्शन झाले. बहुजनांचा हा उत्सव. पण आद्य पूजेचा मान सारस्वतांचा. पण कुठे बडेजाव नाही , कि जातीय अभिनिवेश नाही. ' जाती पातीच्या जुनाट भिंती , कुठेतरी थिट्या होतांना दिसल्यात.)
(' एक समस्या, एक विचार आणि एक कृती' हे मनाशी जुळलेले समीकरण काहीसे अपूर्ण होते. त्याच्या पुढचा भाग या शिमग्यात गवसला. सर्वांना एकाच वेळी गुंतवून ठेवेल असा कार्यक्रम! मग भलेही तो धार्मिक का असेना..! 'दाद्या'च्या भाषेत organised efforts )

5 comments:

अवधूत डोंगरे said...
This comment has been removed by the author.
Sheetal Bhangre said...

छान लिहिल आहेस. तुझ्या नेहमीच्या शैलिपेक्षा काहीतरी वेगले. बाकी तू वर्णन (कुठल्याही गोष्टीच) छानच करतोस..
हे प्रवास वर्णन अजुनच चांगले आहे

Anonymous said...

खुप छान लिहिलय.. पण माफ कर थोड अजुन भिडणार हव होत...की मन भरुन आल पाहिजे.. हे फक्त माझ मत आहे...

renuka petare said...

खुप छान लिहिलय.. पण माफ कर थोड अजुन भिडणार हव होत...की मन भरुन आल पाहिजे.. हे फक्त माझ मत आहे...

johaar-maibaap said...

Thanks Renuka , I will keep it in the mind.